
श्रीरामपूर:- 15 व्या वित्त आयोगातून पंचायत समितीलाही अधिकार दिला. पंचायत समितीची वाईट परिस्थिती होती.पंचायत समिती सदस्यांना पैसा मिळत नव्हता. आता मात्र त्यांना 10 टक्के निधी खर्च करता येणार आहे. अशा पध्दतीने पंचायत समिती सदस्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. या आघाडीच्या सरकारने हा चांगला निर्णय घेतला असल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
श्रीरामपूर येथील पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे भुमिपूजन समारंभप्रसंगी ना. अब्दुल सत्तार बोलत होते.ना. अब्दुल सत्तार म्हणाले की, आज याठिकाणी अनेकांकडून फटकेबाजी ऐकायला मिळाली. सगळ्यांच्या भावना माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. निधी मिळत नसल्याने यापुढे पंचायत समिती निवडणुकीला कोणी उभे राहणार नाही असे म्हटले होते. 8 लाख घरकुले ग्रामपंचायत हद्दीत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी जमीन ज्यांना उपलब्ध नाही त्यांना वाढीव निधी देण्याचाही निर्णय घेतला आहे. गावाच्या शिवारात अतिक्रमणधारक आहेत त्यांना नियमित करण्याचा तसेच मालकी देण्याचा निर्णय झाला आहे.माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे म्हणाले, श्रीरामपुरातील एखादे नवीन काम सरळ कधीच होऊ शकत नाही. विघ्न आल्याशिवाय या तालुक्यात काम पूर्ण झाले नाही. हा जुना इतिहास आहे. तालुक्याच्या विकासासाठी पक्ष राजकारणाच्या पलिकडे जाऊन आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत. यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे.
माजी आ. भानुदास मुरकटे म्हणाले, त्यांना शिवसेनाप्रमुखांनी संधी दिली हे खरे असले तरी प्रत्येक वेळी त्यांची संधी हूकत चालली हे त्यांना कळले नाही. वयोमानाचा परिणाम असला पाहिजे. आता त्यांना लक्षात आले की, त्यांना माझ्याबरोबर राहिल्याशिवाय पर्याय नाही.
आम्ही दोघे एकमेकांबरोबर राहिलो तर आम्हा दोघांना संधी आहे. सदाशिवराव आम्ही दोघे एकमेकांबरोबर राहिलो तर तुम्हाला आपोआपच संधी मिळणार आहे. आम्ही जोपर्यंत खंबीर आहोत तोपर्यंत तुमची संधी जाणे नाही. आता तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तुमच्यासाठी ज्या लोकांनी काम केले त्यांच्याबरोबर उभे राहावे लागणार आहे.
खा. सदाशिव लोखंडे म्हणाले की, 25 वर्षे ही पंचायत समिती सतत गटा-तटात होती हे मला मिळालेल्या दोन निमंत्रण पत्रिकांवरून कळाले. मुरकुटे यांनी आमदार व्हावे म्हणून मला येथे आणले होते; परंतु मी 17 दिवसांतच खासदार झालो. श्रीरामपूर तालुक्यात कोण कोणाबरोबर आहे हे लवकर कळतच नाही. मला साडेसहा वर्षे झाली मी कोणाकडे आहे. जाव कोणाकडे? मला कळेना ! हा राखीव मतदार संघ असल्यामुळे याठिकाणी मालक खूपच आहेत.
महाआघाडीविषयी बोलताना ना. सत्तार म्हणाले, पहिले 15 दिवस मी विखे यांच्याबरोबर गेलो होतो; रस्त्यातून परत आलो. त्यावेळी मी एका मार्गाने तर श्री. विखे दुसर्या वाटेने गेले, ती वाट बाभळीच्या झाडाखाली गेली आणि मी आंब्याच्या झाडाखाली गेलो अन् मंत्री होऊन टोपीसोबत आलो.