विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन?, हिवाळी परीक्षा होणार मार्च महिन्यात

कोरोना संकट काळात विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन पर्याय स्वीकारून घेण्यात आल्या होत्या. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे नियमितपणे घेतल्या जाणाऱ्या ऑफलाइन परीक्षा घेण्यात यावा, असा सूर शिक्षण विभागातून उमटत आहे.
कोरोनामुळे उद्भवलेल्या अपवादात्मक परिस्थितीत महाराष्ट्रात, उच्च शिक्षणातील संस्थांनी, उन्हाळी २०२० च्या परीक्षा बहुतांशी ऑनलाइन पद्धतीने घेतल्या. त्या परिस्थितीत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणे योग्य होते.
आता कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे व त्याच बरोबर कोरोना प्रतिबंधक लस पण अवघ्या काही दिवसात उपलब्ध होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत, महाराष्ट्रात उच्च शैक्षणिक संस्थांनी हिवाळी २०२० च्या परीक्षा, ज्या मार्च २०२१ मध्ये होण्याची शक्यता आहेत, त्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेणे योग्य ठरेल, असे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अगदीच शक्य नसल्यास, अपवादात्मक परिस्थितीत, ऑनलाईन पद्धती स्वीकारावी लागल्यास, त्या पद्धतींमध्ये गुणात्मक सुधारणा अपेक्षित आहे.
तर पदवीचे अवमूल्यन
मागील ऑनलाइन पद्धतीत, बहुतांशी, परीक्षार्थींचे परीक्षा सोडवतांना निरीक्षण, देखरेख करण्यात आले नव्हते. त्यामुळे परीक्षार्थी काही गैरमार्गाने परीक्षा सोडवत आहे का, याबद्दल शंका निर्माण व्हायला वाव राहतो. निरीक्षण किंवा देखरेखी शिवाय परीक्षा घेण्याचे समर्थन निश्चितपणे कोणी करणार नाही. परीक्षार्थींनी घरी बसून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा दिल्यास त्याला गैर मार्गाचा अवलंब करण्याची संधी न देण्याची योजना ऑनलाइन पद्धतीत आणण्याची जरूरी आहे. अन्यथा अश्याने पदवीचेच अवमूल्यन होईल.
ऑनलाईन परीक्षांचे निरीक्षण होत नसल्याने गैरमार्गाचा वापर करून पेपर सोडवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घ्यावी किंवा अगदीच पर्याय नसेल तर ऑनलाइन परीक्षा घेताना निरक्षणाची व्यवस्था होणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता कळली पाहिजे. त्यासाठी विद्यापीठाने अभ्यासक्रम कमी करून परीक्षा लेखी स्वरुपात घ्याव्यात. शासनाच्या ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या निर्णयाशी आम्ही सहमत नाही. ऑनलाइनमध्ये अनेक अडचणी येतात. नेटवर्क राहत नाही. अनेकांकडे स्मार्ट फोन नाही. याचा सारासार विचार करून लेखी स्वरूपातच परीक्षा घेणे योग्य ठरेल.