देशातील काही भागांमध्ये अचानक वाढलेल्या उष्णतेमुळं गेल्या तीन दिवसांत भारतात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
आठवड्याच्या शेवटी उत्तर प्रदेशात उष्णतेमुळं सुमारे 33 जणांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये मतदान अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसह निवडणुकीची कामं करणाऱ्यांचा समावेश होता. शनिवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान झालं.
ओडिशा राज्यात उष्माघातामुळं सुमारे 20 जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रानं 40-64% मृत्यू दर असल्यानं उष्माघात “जीवघेणा” ठरत असल्याचं म्हटलं आहे.
उत्तर आणि मध्य भारत आणि पश्चिमेकडील काही भागांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून उष्णता प्रचंड वाढली आहे. तसंच कमाल तापमान 45-46C च्या आसपास आहे आणि काही भागात ते 50 अंशापर्यंत पोहोचलं आहे.
मात्र, मान्सून सुरू झाल्यानं येत्या काही दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
या उन्हाळ्यात तापमान 40 अंशांपेक्षा जास्त होतं. दिल्लीसारख्या शहरात तर पारा पन्नाशीला टेकला होता.
भारतातल्या शहरांत अशी इतकी भयानक उष्णता का वाढली? या उष्णतेच्या लाटेची कारणं काय?
देशातल्या इतर भागांच्या तुलनेत शहरांधला उष्मा जवळपास दुप्पट वेगाने वाढतोय. आयआयटी भुवनेश्वरने केलेल्या संशोधनातून हे समोर आलंय. हे संशोधन नेचर या पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आलंय.
जगभरातली उष्णता वाढण्यामागे ग्लोबल वॉर्मिंग हे एक कारण आहेच. पण भारतात झपाट्याने वाढलेलं आणि वाढत जाणारं शहरीकरण हे शहरांतल्या वाढत्या उकाड्यामागचं प्रमुख कारण असल्याचं आयआयटी भुवनेश्वरच्या संशोधनातून समोर आलंय.
संशोधन कसं करण्यात आलं?
भारतातल्या शहरी आणि ग्रामीण भागांमधल्या 141 शहरांमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये तापमानात किती वाढ झाली, दिवसाचं आणि रात्रीचं तापमान किती नोंदवलं गेलं, या काळात या शहरांमध्ये काय बदल झाला, याचा अभ्यास या संशोधनासाठी करण्यात आला.
नासाच्या MODIS ( The Moderate Resolution Imaging Spectrodiometer) अॅक्वा सॅटेलाईट च्या रात्रीच्या वेळच्या तापमानांचा डेटा या संशोधनासाठी अभ्यासण्यात आला. रात्रीच्या वेळी जमिनीच्या पृष्ठभागावरून किती उष्णता उत्सर्जित होते, हे यामध्ये मोजलं जातं. तसेच तापमान बदलाचे ट्रेंड तपासण्यासाठी 2003 ते 2020 या काळातील डेटाचाही अभ्यास करण्यात आला.
यासोबतच शहरी भागांमधली तापमान वाढ आणि या शहरांना लागून असलेल्या इतर भागांमधली तापमान वाढ याचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
संशोधनात काय आढळलं?
भारतातल्या शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये वाढत असलेल्या उष्णतेबद्दल काही महत्त्वाची निरीक्षणं या संशोधनातून नोंदवण्यात आली आहेत.
शहरी भाग आणि त्यांना वेढणारे निम-शहरी आणि ग्रामीण भाग याची तुलना केल्यानंतर संशोधकांना काही बाबी लक्षात आल्या. प्रदेशातल्या हवामान बदलांमुळे काही प्रमाणात उष्मा वाढलेला असला, तरी बहुतेक शहरांमधलं तापमान वाढीचं प्रमाण हे जास्त असल्याचं आढळलं.
भारतातल्या सगळ्या शहरांमधलं रात्रीचं तापमान वाढल्याचं या संशोधनातल्या डेटावरून स्पष्ट झालं. जवळपास प्रत्येक शहराच्या Nighttime Land Surface Temparature (NLST) म्हणजे रात्रीच्या वेळच्या जमिनीच्या तापमानात दर दशकाला ०.53 डिग्री सेल्शियसची वाढ झालेली आहे.
त्यातही पूर्व आणि मध्य भारतातल्या शहरांमुळे शहरी तापमानवाढ अधिक झाल्याचं संशोधन सांगतं.