मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे बांगलादेशात (Bangladesh) अस्थिर परिस्थिती निर्माण झाली असून मोठा हिंसाचार उफाळला आहे. त्यामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्या भारतात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. तर बांगलादेशातील सत्तेचा ताबा लष्कराने घेतल्याचे बोलले जात आहे.
शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या (Resigns) मागणीसाठी देशात हिंसक निदर्शने सुरु होती. तसेच पंतप्रधान हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या लाखो निदर्शकांनी कर्फ्यूला झुगारून राजधानीच्या रस्त्यावर मोर्चा काढला आणि पंतप्रधानांच्या घरात प्रवेश केला. यावेळी ढाक्यामध्ये चिलखती वाहनांसह सैनिक आणि पोलिसांनी (Police) सुश्री हसिना यांच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गांवर काटेरी तारे लावली होती. परंतु मोठ्या गर्दीने हे सर्व अडथळे तोडून टाकले.
दरम्यान, काल झालेल्या भीषण चकमकींमध्ये तब्बल ९८ लोक मारले गेले होते. त्यानंतर आता चकमकींमधील मृतांची संख्या ३०० वर पोहोचली आहे. तसेच थोड्याच वेळात बांगलादेशचे लष्करप्रमुख वाकर-उझ-झमान राष्ट्राला संबोधित करणार आहेत. शेख हसिना यांच्या १५ वर्षांच्या राजवटीचा हा सर्वात वाईट काळ ठरला आहे. दुसरीकडे बांगलादेशात अशांतता वाढली असून संपूर्ण देशात निदर्शने व्यापक झाली आहेत. तसेच सरकारविरोधी चळवळ वाढली असून लोकांच्या पाठिंब्याचे आवाहन करणारी गाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये हे आंदोलन सुरु आहे.१९७१ साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तसेच हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये ३० टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना ५ टक्के आरक्षण दिले जाते. तर एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते.