भारताच्या जीवावर स्वातंत्र्य उपभोगत असलेल्या बांगलादेशने आता भारतालाच डोळे दाखविण्यास सुरुवात केली आहे. शेख हसिना यांचा सत्तापालट झाल्यापासून बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. बांगलादेशातील या अस्थिरतेचे पडसाद भारतीय सीमेवरही उमटू लागले आहेत. नुकतेच भारतीय जवान आणि बांगलादेशी सैन्य समोरासमोर आले होते. परंतू, गाववाल्यांनी रौद्ररुप दाखविताच बांगलादेशी सैनिक आल्या पावली परत माघारी पळून गेले आहेत. याचा व्हिडीओ समोर आला आहे. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात भारत-बांगलादेश सीमेवर नुकताच हा तणावाचा प्रसंग आला होता. सीमा सुरक्षा दलाचे जवान भारतीय हद्दीत काम करत होते, याला बांगलादेशच्या सैन्याने आक्षेप घेतला. यामुळे दोन्ही सैन्यात बाचाबाची सुरु झाली. ही बातमी सुकदेबपुरच्या गावकऱ्यांना समजली आणि ते कोयता, मोठाले सुरे, दांडे घेऊन सीमेवर दाखल झाले.
भारतीय नागरिकांचे रौद्ररुप पाहून बांगलादेशी सैनिकांची तंतरली आणि तिथून त्यांनी काढता पाय घेतला. यावेळी गावकऱ्यांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम” आणि “जय श्री राम”चे नारे देण्यास सुरुवात केली. बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी बीएसएफ कठोर पाऊले उचलत असताना हा वाद झाला आहे. सीमेवर कुंपण घालण्याच्या प्रकल्पाला दोन्ही देशांनी पूर्व-मंजूरी दिलेली होती. तरीही बांगलादेशी सैनिक त्याला विरोध करण्यासाठी आले होते. बीएसएफने अधिकारी पातळीवर या वादावर बांगलादेशला याची कल्पना दिली. यानंतर हा वाद मिटविण्यात आला.