जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावानंतर (India vs Pakistan War) जगातला कोणता देश कुणाच्या बाजूनं असेल याची चर्चा सुरू झालीय. भारताचा जुना मित्र असलेला रशिया भारताच्या बाजूनं धावून आलाय. तर चीनने आपला खरा रंग दाखवत पाकिस्तानला पाठिंबा दिलाय. दहशतवादाविरोधातल्या लढ्यात रशिया भारतासोबत असल्याची ग्वाही, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली.
व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून बातचीत केली आणि पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला. या हल्ल्यातल्या दोषींना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना शिक्षा मिळायलाच हवी, यावर पुतीन यांनी जोर दिला. तर दुसरीकडे भारत- पाकिस्तानच्या तणावादरम्यान चीननं मोठं विधान केलंय. स्थिरतेसाठी पाकिस्तानला पाठिंबा देऊ, असं चीननं जाहीर केलंय. पाकिस्तानचे राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी इस्लामाबादमध्ये चीनच्या राजदूतांची भेट घेतली. त्यावेळी चीनंन ही ग्वाही दिली. तसेच जपानने भारताला पाठिंबा जाहीर केला आहे. तर तुर्कस्थानने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे.
भारताच्या बाजूने कोण?
1. रशिया
2. जपान
पाकिस्तानच्या बाजूने कोण?
1. चीन
2. तुर्कस्थान
इराणचा भारत आणि पाकिस्तानला सल्ला-
इराणनेही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना संयम राखण्याचा सल्ला दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी चर्चेतून तोडगा काढावा असं आवाहन त्यांनी केलंय. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची हे पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी हे आवाहन केलं. गुरूवारी (8 मे) अराघची हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. तिथे ते भारतीय नेतृत्वाशीही शांततेबाबत चर्चा करतील.
भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव वाढला-
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव कमालीचा वाढला आहे. युद्धाचे ढग निर्माण झालेत. दहशतवाद्यांविरोधात भारत मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई कऱण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास कसं वागावं, काय उपाययोजना कराव्या यासाठी नागरी संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना उद्या मॉक ड्रील (Mock drill) घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.