केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर (Raigad) छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी व शिवरायांच्या समाधीच्या जिर्णोद्धारास १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी बोलतांना शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आपले विचार मांडले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला. त्यामुळे त्याचे विचार महाराष्ट्रापर्यंत (Maharashtra) मर्यादीत ठेवू नका, असे त्यांनी म्हटले.
यावेळी बोलतांना शाह म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला मला बोलवण्यात आलं हे मी माझं भाग्य समजतो. मी राजमाता जिजाऊंना नमन करतो. त्यांनी फक्त शिवरायांना जन्म दिला नाही तर बाल’ शिवाजीला त्यांनी स्वराज्य हा विचार दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले. सुवर्ण सिंहासन ज्या ठिकाणी होते तिथे मी शिवरायांना अभिवादन (Greetings) केले त्यावेळी मनात उचंबळून आलेल्या भावना शब्दांत मांडता येणार नाहीत. मी अशा व्यक्तीच्या राज दरबारात उभा होतो ज्या व्यक्तीने स्वराज्य, स्वधर्म यासाठी त्यांना आयुष्य वेचले. आदिलशाही, निजामशाही याने वेढलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. स्वराज्याचे स्वप्न यशस्वी झाले” असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माच्यावेळी महाराष्ट्र अंधकारात बुडाला होता. स्वराज्याची कल्पनाही कुणी करत नव्हते. स्वधर्म आणि स्वराज्य याबाबत बोलणं लोक गुन्हा समजू लागले होते. पण शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, भगवा फडकवण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला. महाराजांची सेना कटक, कर्नाटकपर्यंत पोहोचली तेव्हा लोकांना विश्वास वाटला की देश आणि धर्म वाचला. देशाच्या स्वातंत्र्याला लवकरच १०० पूर्ण होतील तेव्हा भारत विकसित असेल. पण या सगळ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचेच विचार होते. मी आजवर अनेक नायकांची चरित्रे वाचली आहे. मात्र असे साहस आणि दृढ इच्छाशक्ती, अकल्पनीय रणनीती मी एकाही व्यक्तीमध्ये पाहिले नाही”, असे अमित शाह यांनी यावेळी सांगितले.
तसेच “अलमगीर म्हणणारा व्यक्ती महाराष्ट्रात पराजित झाला. त्याची समाधी महाराष्ट्रात आहे. शिवचरित्र (Shiv Charitra) प्रत्येक भारतीयांना शिकवले गेले पाहिजे. प्रत्येक मुलाला शिकवले पाहिजे.हात जोडून विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका. देश आणि जग त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहे. स्वधर्माचा अभिमान, स्वराज्याची आकांक्षा आणि स्वभाषेला अमर बनवणे हे तीन विचार देशाच्या सीमेशी संबंधित नाही. मानवी जीवनाच्या स्वाभिमानाशी जोडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा दुसऱ्याने आपल्यावर सत्ता गाजवली, गुलामीची मानसिकता रोवली तेव्हा हे विचार दिले” असेही अमित शाह म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.