मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे संपूर्ण जगातील कामकाज ठप्प झाले असून याचा परिणाम उड्डाणे, विमानतळ, बँका आणि शेअर बाजारासह सर्व क्षेत्रांवर झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही समस्या लवकर सुटली नाही तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. भारतातील एअरलाइन्समध्ये इंडिगो, स्पाइसजेट आणि आकासा एअरचा समावेश असून या फ्लाईट्सचाय बुकिंग आणि चेक इन सेवांवर सर्वाधिक परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्ट 365 ने म्हटले आहे की ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
मायक्रोसॉफ्ट या दिग्गज टेक कंपनीच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे जगभरातील विंडोजवर चालणाऱ्या सिस्टीमला समस्यांना सामोरे जावे लागले. लंडन स्टॉक एक्स्चेंजमध्ये व्यवहाराला अचानक ब्रेक लागला. भारतीय स्टॉक एक्स्चेंजमध्ये विस्कळीत होण्याचे वृत्त नसले तरी येथील अनेक कंपन्यांच्या हवाई सेवांवर वाईट परिणाम झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, अब्जाधीश बिल गेट्स यांनी सह-स्थापित कंपनी मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड गेल्या गुरुवारीच सुरू झाला आणि शुक्रवार, १९ जुलै रोजी इतका वाढला की शेअर बाजारापासून बँकांपर्यंतचे सर्व काम ठप्प झाले. CrowdStrike च्या सेवांमध्ये व्यत्यय आल्याने लोकांच्या संगणक प्रणाली बंद झाल्या किंवा त्यांच्या स्क्रीन पूर्णपणे निळ्या झाल्या.
ऑस्ट्रेलियात सार्वधिक प्रभाव
मायक्रोसॉफ्टच्या तांत्रिक बिघाडाचा सर्वाधिक फटका ऑस्ट्रेलियाला बसल्याचे दिसत असून सिडनी मॉर्निंग हेराल्डने म्हटले की देशातील आघाडीचे न्यूज चॅनल एबीसी प्रभावित झाली आणि बातम्या प्रसारित करण्यात अडचणी येत होत्या. त्याचवेळी सुपरमार्केटसह पोलिस सेवांवरही परिणाम झाला असून अनेक ग्राहकांनी कार्डही काम करत नसल्याच्या तक्रारी केल्या तर मेलबर्न विमानतळाने म्हटले की चेक-इनसह अनेक उड्डाणे प्रभावित झाली असून एअरलाइन्स कंपनी व्हर्जिन ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे की त्यांची सर्व उड्डाणे सिडनी विमानतळाकडे वळवण्यात आली आहेत.
लंडन शेअर बाजार ठप्प
ऑस्ट्रेलियासह लंडन येथेही मायक्रोसॉफ्टच्या आउटेजचा प्रभाव दिसून आला आणि देशांतर्गत स्टॉक मार्केट ठप्प झाले. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये पोलिस सेवा 911 प्रभावित झाली तर, ब्रिटीश वृत्तवाहिनी स्काय न्यूजवर बातम्या प्रसारित करणे अशक्य झाले आहे. याशिवाय जगभरातील कोट्यवधी ग्राहकांना विंडोज वापरण्यात अडचणी आल्या आणि त्यांचे संगणक बंद होत आहेत. लोकांच्या PC वर ‘तुमच्या PC वर प्रॉब्लेम आहे आणि कृपया रीस्टार्ट करा. आम्ही काही त्रुटी पाहत आहोत आणि लवकरच रीस्टार्ट करू’, असे लिहिलेले दिसत आहे.