श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथे बिबट्याने येथील शेतकरी शिवाजी साबळे यांच्या दोन कालवडीचा फडशा पाडल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीरामपूर-खैरी निमगाव रोडवरील शिवारात शिवाजी महादु साबळे यांच्या एका कालवडीचा काही दिवसापूर्वी बिबट्याने (Leopard) फडशा पाडला होता. पुन्हा शिवाजी साबळे यांच्याच दुसर्या कालवडीचा बिबट्याने फडशा पाडल्या साबळे यांचे मोठे नुकसान झाले आहे. गाईंसाठी असलेल्या जाळीच्या खालच्या बाजुने येऊन बिबट्याने कालवड ओढत नेत अर्धवट खाऊन सोडून दिली.
यापूर्वी साबळे यांच्या दोन कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडल्यानंतर पुन्हा शिवाजी साबळे यांच्या एका कालवडीचा बिबट्याने फडशा पाडला होता. त्यानंतर पुन्हा दुसरी कालवड ओढत नेऊन तिचाही फडशा पाडल्याने परिसरात बिबट्याची दहशमत निमार्ण झाली आहे. तर काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर खैरी रोडवर याच ठिकाणी दुचाकीवर जाणार्या गोंडेगाव येथील अन्वर शेख आणि त्यांच्या पत्नीवर देखील बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती.
तसेच चितळी येथील दोघांवर याच ठिकाणी बिबट्याने हल्ला केला आहे. परिसरातील नागरिक बिबट्याच्या धास्तीने भयभिय झालेले आहे. दरम्यान घटनेची माहिती दिल्यानंतर वनाधिकारी अक्षय बडे तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ.सुनिल सानप यांनी घटनेचा पंचनामा केला. यावेळी उपस्थित ग्रामस्तांनी या परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली.