श्रीरामपूरमध्ये काँग्रेस पक्ष “स्वाभिमानी श्रीरामपूर” असा नारा देत असताना, जनतेच्या स्वाभिमानाला पैशाच्या जोरावर खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
काही दिवसांपूर्वी सावकारकी व जमीन बळकावण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या पिता-पुत्रांची पुन्हा कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मधील काँग्रेस उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे देऊन मतदान खरेदी करण्याचा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील CCTV फुटेज व्हायरल झाले असून, त्यात काँग्रेसचे उमेदवार व कार्यकर्ते प्रभागातील नागरिकांच्या घरी जाऊन मतदान यादीतील नावे वाचून पैसे वाटत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, “मतदारांना पैसे वाटून निवडणूक लढवणे कितपत योग्य?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परिणामी, प्रभाग क्रमांक २ मधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.






