मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे. या योजनेचा सर्वत्र बोलबाला सुरू आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांच्या पोटात दुखत आहे. त्यांना गोरगरिबांची काहीही जाण नाही. कारण देण्याची दानत लागते. ते घेणारे होते, आम्ही देणारे आहोत, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. माझ्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो कायम मिळणारच, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
भाडणे (ता.साक्री) येथे झालेल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधक म्हणत होते… लाडकी बहीण योजना आणली मग लाडक्या भावाचे काय? त्यामुळे आम्ही लाडक्या भावांसाठी देखील योजना आणली. त्यातून तरुणांना स्टायपेंड देणारे महाराष्ट्र राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे. लाडके बहिणी योजनेवर विरोधक आरोप करीत असून तुमच्याकडे अडीच वर्ष सत्ता होती, तेव्हा तुम्ही का दिले नाही, तुमच्या पोटात का दुखते, असा सवाल करीत, तुम्ही तर दिले नाही, आम्ही देतोय त्याचे स्वागत करायला पाहिजे. मात्र विरोधकांनी कोणाच्यातरी माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र न्यायालयाने लाडक्या बहिणीच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाचे मी मनापासून धन्यवाद मानतो. या योजनेचा प्रतिसाद पाहून आता विरोधक यात्रा काढू लागले आहेत. त्यामुळे आता ही यात्रा की येड्यांची जत्रा, असा घणाघातही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. जनतेने आता योजनेवर टीका करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. उद्धव ठाकरेंची नाव न घेता अशा सावत्र भावांपासून सावध रहावे. विरोधक सतत काही ना काही कुरघोडी करीत आहेत. मात्र आमचे सरकार आणखी मजबूत झाले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.