अखेर महाराष्ट्राला ज्या ऐतिहासिक क्षणाची प्रतीक्षा होती, तो क्षण आज वरळीतील NSCI डोममध्ये पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन राजकीयदृष्ट्या वेगळे झालेल्या ठाकरे बंधूंनी जवळपास १९ वर्षांनंतर एकत्र एका मंचावर येत राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे.
राज्यातील त्रिभाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द झाल्यानंतर या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी ‘मराठी विजय मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र आल्याने, उपस्थित हजारो नागरिकांच्या साक्षीने मराठी अस्मितेचा आणि एकजुटीचा महत्त्वपूर्ण क्षण साकारला.
या मेळाव्यात मराठी भाषा, संस्कृती आणि स्वाभिमानाचे समर्थन करत, राज्यातील नागरिकांना एकजुटीचा संदेश देण्यात आला. अनेक मराठीप्रेमींनी या ऐतिहासिक क्षणाला उपस्थित राहून साक्ष दिली.
राजकीय भिन्नतेनंतर तब्बल दोन दशके वेगळे राहिलेल्या ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र येणे, हा केवळ भावनिक नव्हे तर राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.