मुंबई | Mumbai
कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान AI2744 लँडिंगनंतर धावपट्टीवरून घसरले. सोमवारी सकाळी एअर इंडियाचे विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. मात्र, लँडिंगदरम्यान, विमान धावपट्टीवरून घसरले. मुसळधार पावसामुळे अपघात घडल्याची शक्यता आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असून या विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहे.
२१ जुलै रोजी कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे AI2744 विमान धावपट्टीवर उतरताना जोरदार पावसामुळे घसरले. पण पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखवत विमान कंट्रोल केले, यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची आणि क्रूची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. ते पुढे म्हणाले की, विमानाला पुढील वापरासाठी मंजुरी देण्यापूर्वी आवश्यक तपासणी केली जात आहे.
मुंबई गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे, यामुळे विमान प्रवासात अनेक अडचणी येत आहे. पावसाच्या पाण्यामुळे धावपट्टीवर पाणी साचले आहे. त्यामुळे टेक ऑफ आणि लँडिंगवेळी अडथळे निर्माण होत आहे. मुंबईतल्या पावसामुळे काही फ्लाइट रद्द केल्या आहेत. तर काही फ्लाईट उशिराने उड्डाण घेत आहेत. अशात आता मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विमान लँडिंगदरम्यान, तीन टायर फुटल्याची माहिती आहे. तसेच इंजिनलाही काही प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, वैमानिकच्या सतर्कतेमुळे विमान सुरक्षितपणे टर्मिनल गेटपर्यंत पोहोचले. दरम्यान, सर्व प्रवासी सुखरूप असून, पुढील तपास सुरू आहे.