श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
येथील जैन स्थानकात काल पर्युषण पर्वाच्या शेवटच्या दिवशी क्षमायाचना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गेल्या महिन्यात पार पडलेल्या जैन श्रावक् संघाच्या निवडणुकीच्या संदर्भाने दोन गटात शाब्दिक चकमक उडाली. याची दिवसभर शहरात चर्चा सुरू होती. क्षमायाचनेच्या या कार्यक्रमासाठी माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सिद्धार्थ मुरकुटे, मंजूश्री मुरकुटे, हेमंत ओगले, प्रशांत लोखंडे, सचिन गुजर, संजय फंड, संजय छल्लारे यांच्यासह प्रमुख राजकीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी संयोजकांनी आमदार कानडे व माजी खासदार लोखंडे बोलतील असे सांगितले. त्यामुळे बोलण्याची इच्छा असलेले माजी नगरसेवक किरण लुणिया यांनी निवडणुकीचा संदर्भ देत विद्यमान अध्यक्ष रमेश लोढा यांनी सभासदांची फसवणूक करत ही बिनविरोध निवडणूक घेतली, असा आक्षेप घेतला. आमदार कानडे यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर लुणिया उठले असता संयोजकांनी माईक बंद करून बाजूला ठेवला. यामुळे एकच गदारोळ झाला.
आम्हाला बोलू द्या, तुम्ही पावत्यांवर खाडाखोड करत फसवणूक करत निवडणूक घेतल्याचे लुणिया, अभय मुथा आदी ओरडून सांगत होते. दुसर्या बाजूला लोढा, नितीन पिपाडा प्रतिउत्तर देत होते. दोन्ही बाजूंनी आरोप सुरू होते. जैन समाजात पवित्र समजल्या जाणार्या क्षमायाचनेच्या कार्यक्रमातच झालेल्या या राड्यामुळे राजकीय नेत्यांनी याठिकाणाहून काढता पाय घेतला.
                                
                                
                                
                                




