श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील कॉलेज रोड परिसरात एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी येथील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु त्याला पुढील उपचारासाठी लोणी येथे हलविल्याचे समजते. शहरातील कॉलेज जवळील गायकवाड शाळेच्या पाठीमागील कृष्णविहार परिसरात काल दि. 21 जानेवारी रोजी दुपारी शाहरुख पठाण या तरुणावर चॉपरने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी गोळीबार करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
शाहरुखच्या डोक्यात, छातीवर, पाठीवर चॉपरने वार करण्यात आल्याचे समजते. त्याला सुरूवातीला शहरातील साखर कामगार रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला लोणीला प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉ. रवींद्र जगधने यांनी सांगितले. दरम्यान घटनास्थळी शहर पोलिसांनी येऊन पाहणी केली. शाहरूखच्या खुनाचा प्रयत्न कोणी केला आणि कोणत्या कारणामुळे केला? याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्यात आली नव्हती.
गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी वॉर्ड नं 2 मध्ये अशीच घटना घडली होती. यामध्ये एका तरुणावर वार करण्यात आले होते. त्याआधीही शहरातील एका व्यावसायिकास दुकानात घुसून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. विधानसभा निवडणुकीच्या काळात माजी आमदारांवर गोळीबार झाल्याची कथित चर्चा आहे. या सर्व घटना पाहता श्रीरामपूर शहरामध्ये कायद्याचे राज्य राहिलेले नाही, असे दिसून येते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
संध्याकाळनंतर महिला घराच्या बाहेर पडू शकत नाही. किंवा पडल्या तरी त्या सुरक्षित राहतील, अशी खात्री राहिलेली नाही. त्यामुळे श्रीरामपूरमध्ये कायदा व सुव्यवस्था मोडित निघाल्याचे दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला व श्रीरामपूर विभागाला खमके पोलीस अधिकारी नियुक्त करावेत तसेच गुन्हेगारी वृत्तींना जो कोणी संरक्षण देत असेल त्यांचाही बंदोबस्त करण्यात यावा, अशी अपेक्षा शहरातील सामान्य नागरिकांनी केली आहे.