लोकसभा निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला. पण त्यानंतर संगमनेर व पारनेरला दिलेला जोरदार झटका शेवटपर्यंत कायम विरोधकांच्या लक्षात राहील, असे स्पष्ट करतानाच आता श्रीरामपूरसाठी थोडे थांबा..लक्ष घालतो, अशा शब्दांत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला.
श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील शुभम मंगल कार्यालय शेजारी पार पडलेल्या प्रधानमंत्री आवास योजना फेज-1 अंतर्गत 101 घरकुलांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात सामाजिक ऐक्य, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्त समाज व गुन्हेगारीविरोधी उपाययोजनांवर भर दिला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, गुन्हेगारांचा धर्म नसतो. कोणतीही दुर्बलता न दाखवता त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. महिलांवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी शासन तसेच समाज पातळीवर कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या सोहळ्यात त्यांनी एकतेचा आणि सहकार्याचा संदेश देत, कार्यक्रमात काहींची नावे उच्चारली नसली तरी त्यांच्याविषयी मनात सन्मान आहे, असे नम्रपणे सांगितले. गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येण्याचे आणि आपल्या हक्कासाठी सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रस्ताविकात बाजार समितीचे संचालक नानासाहेब शिंदे म्हणाले की. गेल्या एक वर्षापासून राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री व विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करून गावाला गावठाण जागेसह घरकुलाची उभारणी व्हावी म्हणून प्रयत्न केले. त्याचा मैत्री ग्रुपच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे आज प्रत्यक्षात हे स्वप्न साकार झाले. पुढारी आपल्या सोबत असो वा नसो गावची सर्वसामान्य जनता विखे कुटुंबियांच्या पाठी प्रत्यक्षामध्ये भविष्यकाळात साथ देतील असा अशावाद श्री.शिंदे यांनी व्यक्त केला. त्याला प्रतिसाद देत डॉ. विखे यांनी प्राथमिक शाळेसाठी तसेच दत्तनगरच्या सर्वांगीण कशासाठी भविष्यामध्ये कोणताच निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या आयोजनाची धुरा जनसेवा मंडळ व नाना शिंदे मित्र मंडळ यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. दत्तनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून झाला. त्यांनी गावठाण मंजुरी करून या योजनेची मजबूत पायाभरणी केली होती. या योजनेअंतर्गत 15 एकर क्षेत्रावर एकूण 650 घरकुलांची उभारणी होणार असून, या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून 101 घरकुलांचे भूमिपूजन काल पार पडले. सरपंच सारिका कुंकलोळ यांनी आपल्या भाषणात दत्तनगरसाठी ही घरकुल योजना फक्त घरांचे बांधकाम नसून ती गावाच्या समृद्धीचा पाया असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खा. सुजय विखे यांचे विशेष आभार मानले आणि या प्रकल्पामुळे गावातील भूमिहीन आणि गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी सुरेंद्र थोरात , भीमराज बागुल, दीपक पठारे, यांची भाषणे झाली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, तालुका अध्यक्ष दीपक पटारे, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, मार्केट कमिटी उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच सारिका कुंकलोळ, मार्केट कमिटी सभापती नानासाहेब पवार, जिल्हा परिषद सभापती शरदराव नवले, विभागीय जिल्हाप्रमुख भिमाभाऊ बागुल, माजी पंचायत समिती सभापती संगीताताई शिंदे, उपसरपंच कुसुमबाई जगताप, ग्रामविकास अधिकारी रुबाब पटेल ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी माजी खा.सुजय विखे यांनी दिलेला सामाजिक संदेश सर्वांच्या मनात ठसणारा ठरला आपण फुटलो तर नुकसान आपलेच आहे. समाजाच्या एकतेसाठी आणि पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याकरिता आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. या भूमिपूजन सोहळ्यामुळे दत्तनगरमधील अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारल्या जाणार्या घरांमुळे अनेक गोरगरीब कुटुंबांचे स्वप्न साकार होणार आहे.याप्रसंगी टिळक नगर, दत्तनगर, रांजणखोल, एकलहरे, खंडाळा, उक्कलगाव, आदी गावातील सरपंच उपसरपंच, सोसायटी चेअरमन, व्हॉइस चेअरमन, संचालक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पंकज बागुल यांनी आभार मानले.