अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर 68 हजार 585 मतदार वाढले आहेत. यात सर्वाधिक 11 हजार 82 मतदरांची वाढ नगर शहर मतदारसंघात झाली असून जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक वाढली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 39 लाख मतदारांची संख्यागृहीत धरून प्रभाग रचना आणि आरक्षण काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान जिल्ह्यात जून 2025 पर्यंत एकूण 38 लाख 29 हजार 97 मतदारांची नोंदणी असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेच्या सुत्रांकडून मिळाली. यात 19 लाख 66 हजार 920 पुरुष मतदार आहेत. तर 18 लाख 61 हजार 978 महिला मतदार आहेत. शिवाय 199 तृतीयपंथी मतदार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आठ महिन्यांत जिल्ह्यात 38 हजार 567 महिला मतदार वाढल्या आहेत. तर 30 हजार 20 पुरुष मतदार वाढले आहेत. दोन तृतीयपंथी मतदारांची संख्या घटली आहे.
नगर जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू आहे. ही प्रभाग रचना काढतांना संबंधीत जिल्हा परिषद गट आणि गणाची लोकसंख्या ही गृहीत धरून निश्चित करण्यात येणार आहे. 2017 निवडणुकीनंतर 2021 ला जिल्हा परिषद गट आणि गणातील लोकसंख्या वाढवण्यात आली होती. मात्र, त्यास न्यायालयाने स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत मागील महिन्यांत आदेश देवून निवडणूका घेण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यानूसार कार्यवाही सुरू आहे.
वाढलेले मतदार
अकोले 2 हजार 769, संगमनेर 5 हजार 318, शिर्डी 5 हजार 63, कोपरगाव 3 हजार 617, श्रीरामपूर 4 हजार 977, नेवासा 5 हजार 233, शेवगाव 5 हजार 793, राहुरी 7 हजार 535, पारनेर 6 हजार 341, नगर शहर 11 हजार 82, श्रीगोंदा 5 हजार 84 आणि कर्जत-जामखेड 5 हजार 11 असे आहे.