सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या माध्यमातून श्रीरामपूर येथील एका ज्येष्ठ डॉक्टरांकडून तब्बल 7 कोटी 17 लाख 25 हजार रूपये लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हेगारांनी सर्वोच्च न्यायालय, ईडी आणि पोलीस अधिकार्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे पाठवून डॉक्टरांना घाबरवले व वेळोवेळी त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम हस्तांतरित करून घेतली. या प्रकरणी डॉक्टरांनी सोमवारी (13 ऑक्टोबर) येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, विविध मोबाईल क्रमांक व खातेदारांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी डॉक्टरांना 7 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान अनोळखी मोबाईल क्रमांकांवरून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल येत होते. एका कॉलमध्ये डॉक्टरांना एक नंबर पाठवून हा तुमचा नंबर आहे का? अशी चौकशी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांवर अवैध जाहिरात, अश्लीलता आणि त्रास देणे (हरासमेंट) यासंबंधी प्रकरण दाखल असल्याचे सांगण्यात आले. यानंतर आरोपींनी स्वतःला पोलीस अधिकारी देविलाल सिंग आणि न्यायाधीश म्हणून सादर करत, तुम्हाला डिजिटल अरेस्ट केले आहे असे सांगून डॉक्टरांना घरात नजरकैदेत असल्याची भीती दाखवली. त्यांनी डॉक्टरांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असल्याचेही सांगितले.
संशयितांनी डॉक्टरांना तुमच्या खात्यात काळा पैसा आला आहे, त्यामुळे तुम्हाला अटक होऊ शकते, तुमच्या मुलांचे करिअर नष्ट होईल अशा धमक्या दिल्या. तसेच सर्वोच्च न्यायालय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्या नावाने बनावट नोटिसा, आदेश आणि ओळखपत्रे पाठवली. या दबावाखाली डॉक्टरांनी वेळोवेळी 7 कोटी 17 लाख 25 हजार रूपये विविध खात्यांमध्ये वर्ग केले. डॉक्टरांना अखेर संशय आल्याने त्यांनी अहिल्यानगर सायबर पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विविध मोबाईल नंबरधारक आणि बँक खात्यांधारक अनोळखी व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.