अहमदनगर शहर विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्याच्या नावाखाली काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय ओबीसी समन्वयक मंगल विलास भुजबळ (वय 42 रा. आगरकर मळा, स्टेशन रस्ता, अहिल्यानगर) यांची दीड लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी त्यांनी बुधवारी (12 मार्च) कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेश युवक उपाध्यक्ष बालराजे पाटील (पूर्ण नाव, पत्ता नाही) याने विधानसभेच्या तिकीटासाठी पक्षाला निधी (पक्ष फंड) देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगल भुजबळ या 2024 विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर शहरातून इच्छुक होत्या. मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाली. त्यांनी अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर बालराजे पाटील याने भुजबळ यांच्याशी संपर्क साधून अहमदनगर शहर विधानसभा जागा काँग्रेसला मिळणार आहे, पण त्यासाठी राष्ट्रवादी पार्टीला फंड द्यावा लागेल, असे सांगितले. पुढे बालराजे पाटील याने तिकीट निश्चित होण्यासाठी टोकन म्हणून एक लाख रूपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर त्याने भुजबळ यांना एका बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. विश्वास ठेऊन भुजबळ यांनी टप्प्याटप्प्याने एकूण दीड लाख रुपये पाठवले.
मात्र, शेवटी राष्ट्रवादीने अभिषेक कळमकर यांनाच अधिकृत उमेदवारी दिली आणि भुजबळ यांना कोणीच उमेदवारी दिली नाही. त्यानंतर भुजबळ यांनी पैसे परत मागितले, तेव्हा बालराजे पाटील टाळाटाळ करू लागला. पैसे परत मिळण्याची शक्यता नसल्याने अखेर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात 12 मार्च रोजी फिर्याद दाखल केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.