अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील पाथर्डी, कर्जत, नेवासा, शेवगाव व श्रीरामपूर या पाच तालुक्यात शनिवार व रविवारी मध्यरात्री ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे 315 गावांमधील तब्बल 1 लाख 3 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून याचा फटका 1 लाख 44 हजार शेतकर्यांना बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
शनिवारी शेवगाव तर रविवारी पाथर्डी, कर्जत, नेवासा, अहिल्यानगर, श्रीगोंदा, तसेच सोमवारी पुन्हा पाथर्डी, शेवगाव आणि श्रीरामपूर या तालुक्यात जोरदार पावसाने बँटिंग केली. या पावसाने खरीप हंगामातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात शेतकर्यांची बाजरी, कापूस, तूर, मुग, उडीद, डाळिंब, संत्रा, सीताफळ या पिकांचा समावेश आहे. सोमवारी श्रीरामपूर तालुक्यातील 23 गावांना पावसाने झोपडले असून 394 हेक्टर क्षेत्रातील कापूस, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे.
त्याचा फटका 495 शेतकर्यांना बसला आहे. हे सर्व क्षेत्र 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसानीचे आहे. या पावसामुळे अहिल्यानगर, पाथर्डीमध्ये आलेल्या पूरामध्ये तीनजण वाहून त्यांचा मृत्यू झाला असून पाथर्डीमध्ये 18 तर शेवगावमध्ये 6 अशी 24 लहान जनावरे तसेच पारनेर व संगमनेरमध्ये प्रत्येकी एक मोठे जनावरे असे 26 जनावरे दगावली आहेत.