जिल्ह्यातील 15 नगरपरिषद, नगरपंचायतीपैकी अकोले, पारनेर आणि कर्जतची मुदत अद्याप संपलेली नाही. उर्वरित सर्व ठिकाणी मुदत संपलेली असून दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील 15 नगरपरिषद, नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, आज बुधवार (दि.8) पासून या निवडणूका होणार्या सर्व नगरपंचायती व नगरपरिषदांच्या ठिकाणी प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम सुरू होणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. सोमवार (दि. 6) रोजी मुंबईत जिल्ह्यातील 11 नगरपरिषद व 4 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर आजपासून श्रीगोंदा, जामखेड, शेवगाव, नेवासा, कोपरगाव, पाथर्डी, राहाता, शिर्डी, देवळाली प्रवरा, राहुरी, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर नगरपरिषद व नगरपंचायत या ठिकाणी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर 13 ऑक्टोबरपर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी राहणार आहे.
तसेच हरकती व सूचनावर सुनावणी झाल्यानंतर 28 ऑक्टोबरला अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात येवून 7 नोव्हेंबरला मतदार केंद्रांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 1 जुलै 2025 पर्यंत नोंदणी झाल्या मतदारांची नाव या मतदार यादी राहणार आहे. निवडणूका होणार्या जिल्ह्यातील 12 नगरपंचायत व नगरपरिषदांच्या हद्दीत मतदार यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
नगरपालिका प्रभाग आरक्षणाची आज सोडत
आगामी काळात होणार्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगरसेवक पदासाठी जिल्ह्यातील विविध पालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत आज बुधवारी होत आहे.