अहिल्यानगरकडून पुण्याकडे कारने जात असताना चास (ता. नगर) शिवारात थांबलेल्या कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून डोळ्यात मिरची पूड टाकून दोन लुटारूंनी महिलांच्या गळ्यातील सुमारे सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटून नेले आहेत. मंगळवारी (25 मार्च) पहाटे 3.30 च्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी भाऊसाहेब मोघाजी भोजने (वय 55, रा. जामखेड, ता. अंबड, जि. जालना, हल्ली रा. बाणेर, पुणे) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे जालना जिल्ह्यातील रहिवासी असून कामानिमित्त बाणेर, पुणे येथे वास्तव्यास आहेत. ते त्यांच्या मूळगावी गेले होते. तेथून मंगळवारी पहाटे नगरमार्गे पुण्याकडे कारने कुटुंबासह जात होते. कारमध्ये फिर्यादी, त्यांची पत्नी, मुलगी, दोन लहान मुले व चालक असे होते. नगरच्या पुढे चास शिवारात पहाटे 3.30 च्या सुमारास गेल्यावर फिर्यादी भोजने यांनी चालकाला कार रस्त्याच्याकडेला उभी करायला सांगितली व ते लघुशंकेसाठी कारमधून खाली उतरले. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला अंधारातून अचानक दोघे जण आले. त्या दोघांपैकी एकाने चालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली.
तेवढ्यात दुसर्या चोरट्याने फिर्यादीसह इतरांना चाकूचा धाक दाखवला. महिलेच्या अंगावरील सुमारे सात तोळ्यांचे दागिने काढून घेतले. दोघे चोरटे रस्त्याच्या बाजूला अंधारात पसार झाले. त्यानंतर भोजने यांनी डायल 112 वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. सदर माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे रात्र गस्त घालणारे पथक घटनास्थळी दाखल झाले. भोजने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्या परिसरातील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. अधिक तपास सुरू आहे.