नेवासा तालुक्यातील इमामपूर येथे काल दि 12 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आकाशात अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन परिसरात सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यात आकाशात विजांचा कडकडाट ऐकू येत होता. त्याचवेळी शेतात काम सुरू असलेल्या तरुण शेतकरी गणेश शिवाजी काळे (वय 34) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
इमामपूर गावातील पोपट जानकीराम काळे यांच्या शेतात विद्युत रोहित्र (डीपी) आहे. ते विद्युत रोहित्र जळाले होते. पण काल ते दुरुस्त करून बसविण्यात आल्यानंतर त्या रोहित्रावरून विद्युत पुरवठा करणार्या नवीन विद्युत तारा कामगार व शेतकर्यांच्या मदतीने ओढण्याचे काम सुरू होते. पण सायंकाळी साडेसहा वाजता काम सुरू असताना त्या परिसरात विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळली. त्यामध्ये गणेश शिवाजी काळे (वय 34) या शेतकर्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
या घटनास्थळी कामगारांसह आणखी 10 ते 15 शेतकरी देखील उपस्थित होते. या घटनेनंतर आणखी एक शेतकरी रामदास गोरक्षनाथ काळे (वय 45) या शेतकर्याचा रक्तदाब वाढल्याने त्रास होत होता. त्यांना पुढील उपचारासाठी पाचेगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. गणेश काळे यांना आधी पाचेगाव येथील खासगी दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नेवासा फाटा येथील रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला.
पण नेवासा येथील डॉक्टरांनी गणेश याला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आज मंगळवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गणेश यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. गणेश याची ओळख शांत स्वभावाचा असल्याने तो परिसरात परिचित होता. त्याच्या अपघाती निधनाने परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले.