Eknath Shinde in Nashik: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर नाशिक हेलिपॅडवर पोहोचताच पोलिसांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली.
Eknath Shinde Nashik Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर नाशिक हेलिपॅडवर पोहोचताच पोलिसांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली. यामागे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपांची पार्श्वभूमी आहे. एकनाथ शिंदे बॅगांमधून पैसे घेऊन जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान यावेळी एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं असून आम्ही आताही बॅग घेऊन आल्याचं म्हटलं आहे.
संजय राऊतांनी नेमका काय आरोप केला होता?
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा धुरळा उडत असताना संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये येताना आपल्यासोबत पैशांनी भरलेल्या बॅगा आणल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आपल्या हेलिकॉप्टरमधून मतदारांना वाटण्यासाठी पैसे आणल्याचा आरोप त्यांनी केला होता. संजय राऊतांनी एक्सवर व्हिडीओ शेअर केला होता.
संजय राऊतांनी शेअर केलेला व्हिडीओ नाशिकमधील होता. या व्हिडीओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत होते. हा व्हिडीओ पोस्ट करताना संजय राऊतांनी लिहिलं होतं की, “नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे”.