Loksabha 2024 : नाशिक लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात उभे असलेले शांतिगिरी महाराज आता पंतप्रधान नरेंद मोदी यांचा प्रचार करणार आहेत. शांतिगिरी महाराज वाराणसीला रवाना होणार असून यापूर्वी त्यांनी ही घोषणा केली आहे.
सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) हे लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांनी नाशिक लोकसभेच्या जागेवरून (Nashik Loksabha Constituency) निवडणूक लढवली. नाशिकमध्ये 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. शांतिगिरी महाराज यांनी माघार घ्यावी यासाठी भारतीय जनता पक्षाकडून (BJP) प्रयत्न करण्यात आले मात्र त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. नाशिक लोकसभेसाठी महायुतीत मोठी रस्सीखेच होती. महायुतीकडून हेमंत गोडसे, छगन भुजबळ, शांतिगिरी महाराज, दिनकर पाटील इच्छुक होते. मात्र नाशिकच्या जागेसाठी शिवसेना (Shivsena) आग्रही होती. तर शांतिगिरी महाराज भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक होते. मात्र विद्यमान खासदार शिवसेनेचा असल्याने ही जागा अखेर शिवसेनेला सुटली. पण शांतिगिरी महाराज हे निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
भाजपने केली मनधरणी
शांतिगिरी महाराज यांनी गेल्या एक ते दीड वर्षापासून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मात्र त्यांना एकाही पक्षाने उमेदवारी दिली नाही. अखेर त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. आता नाशिकमध्ये महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत आहे. मतांचे विभाजन होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाने शांतिगिरी महाराज यांची मनधरणी करण्याचा प्रयन्त केला. मात्र त्यांनी आता माघार नाही… आता लढायचं आणि जिंकायचं …. असं म्हणत प्रचाराला सुरवात केली.
नरेंद मोदी आणि शांतिगिरी भेट
15 मे रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांची नाशिकच्या पिंपळगाव इथं महायुतीच्या उमेदवारसाठी प्रचार सभा आयोजित केली होती. यावेळी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांना भेटीचं आमंत्रण देण्यात आलं. मात्र वाहतुकीत अडकल्याने त्यांची भेट होऊ शकली नसल्याच शांतिगिरी महाराज यांनी सांगितलं.