लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांची चांगलीच धाकधूक वाढली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी की महायुती? कुणाला जास्त जागा मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागून आहे. त्यातच राज्यात अनेक ठिकाणी काही ठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे बॅनर्स झळकले आहेत.दरम्यान नवीन नाशिक परिसरात काही बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.
अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे बॅनर काही दिवसापासून नवीन नाशिक परिसरात झळकले आहे. उमेदवार (Candidate) एका जिल्ह्यातील पण बॅनर दुसऱ्या जिल्ह्यात यामुळे नागरिकांमध्ये अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र हे बॅनर महापालिकेचा कुठलाही प्रकारचा कर न भरल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. परिसरातील उत्तम नगर ,विजय नगर आदी परिसरात सदरहू बॅनर झळकले आहेत.
दरम्यान, एकीकडे हातगाडी व रस्त्यावर आपली उपजीविका चालवण्यासाठी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करत अतिक्रमण विभाग कर्तव्यदक्षता दाखविण्याचा दिखावा करतांना दिसतो. मात्र, या अनधिकृत बॅनरवर कारवाई न करण्यात आल्याने अतिक्रमण विभाग संशयाच्या फेऱ्यात सापडला आहे.