लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठीच्या सर्व घडामोडी पार पडल्या आणि अखेर तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपवण्यात आली. भाजपप्रणित एनडीए आघाडीते नेते आणि आता देशाचे पंतप्रधान अशी पुन:श्च ओळख तयार केलेल्या मोदींनी या पदाची जबाबारी स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, सोमवारी एक मोठा निर्णय घेतला. देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे.
पंतप्रधानांचा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी
पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून, किसान सन्मान निधीचा 17वा हफ्ता मंजूर करण्यात आला आहे. आपलं सरकार हे शेतकऱ्यांशी एकनिष्ठ असून, पदाची जबबादारी स्वीकारताच हा पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. येत्या काळात आम्ही शेतकरी आणि संपूर्ण कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करू इच्छितो असंही यावेळी पंतप्रधानांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं.
शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत मोदी सरकारच्या वतीनं तिसऱ्यांदा सत्ता हाती येताच घेण्यात आलेल्या या निर्णयाचा फायदा 9.3 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे, जिथं शेतकऱ्यांच्या खात्यात 17 व्या हफ्त्याचे पैसे लवकरच जमा केले जाणार आहेत. याआधी फेब्रुवारी महिन्याच्या 28 तारखेला या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 16 व्या हफ्त्याचे पैसे जमा करण्यात आले होते.
काय आहे पीएम किसान सम्मान निधी योजना?
देशातील शेतकरी वर्गाला मदतीचा हात देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी म्हणून पीएम किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेमध्ये दिली जाणारी रक्कम एकहाती नव्हे, तर तीन समसमान हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.