मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला महिनाभराची मुदत दिली आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याबाबत सरकारने खात्री द्यावी, अशी मागणी करत जालन्यामधील वडुगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचे उपोषण सुरू आहे. त्यामुळे राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठे विधान केले आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, “सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आपण १३ तारीख दिली आहे. आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे आरक्षण हवं हे दहा महिन्यापासून म्हणत आहे. १३ जुलैच्या आधी सर्व दाखल गुन्हे मागे घ्यायला हवेत. आठ ते नऊ विषय आम्ही शंभूराजे यांना सांगितले आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विषय माहिती आहे, १३ जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवे, असे त्यांनी म्हटले. तसेच मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने सुरु केलेल्या आंदोलनाच्या पाठीशी उभे रहा, नाही तर तुमचे दारात येण्याचे बंद करू”, असा इशाराही जरांगे यांनी मराठा नेत्यांना दिला आहे.
पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की,”मराठा (Maratha) समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्व आमदारांनी मराठ्यांच्या पाठीमागे उभे राहायला पाहिजे. निवडणुकीत आम्ही सर्व आमदारांनाही मतदान करत असतो. याची जाण ठेवत अधिवेशात हा प्रश्न निकाली काढा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. तसेच मराठा नेत्यांनी याकडे गांर्भीयाने न पाहिल्यास विधानसभेत एकालाही मदत करणार नाही.याशिवाय आमच्या मागण्यांबाबत आवाज उठवणे हे आमदारांचे काम आहे, अन्यथा मराठा समाज दारात उभा करू देणार नाही. अधिवेशनात देखील मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडा. कोण पत्र द्यायला येत नाही, याकडे मराठा समाज लक्ष देत आहे. जे मराठा नेते आरक्षण मिळावे यासाठीचे पत्र द्यायला येत नाही, त्यांच्या जवळचे आमदार पडलेच म्हणून समजा,” असा थेट इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
तसेच ओबीसींना आरक्षण (OBC Reservation) असताना ते एवढे लढत आहेत तर आम्हाला आरक्षण नसताना किती लढावे? आरक्षण असणारे लोक असे लढायला लागले, माझ्या मराठ्यांना आरक्षणच नाही. तुम्हाला आरक्षण असताना मिळू नये म्हणून तुम्ही एवढे लढता, तर आम्हाला मिळायचं म्हणून आम्ही किती लढावे ? आपण काय फक्त उघड्या डोळ्यांनी पाहता का?” असा सवाल करत मनोज जरांगे यांनी ओबीसी उपोषणावर टीका केली.