आगामी विधानसभा निवडणुकीला अवघा दीड ते दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे. तर बऱ्याच इच्छुकांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय अनेकजण पक्षांतरही करत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर अनेक आमदार (MLA) शरीराने अजित पवारांसोबत असले तरी मनाने मात्र शरद पवार यांच्यासोबत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे विद्यमान आमदार विजयाचे गणित बघून सोईच्या पक्षात जाण्याची चाचपणी करत आहेत.
अशातच आता सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार असलेले अतुल बेनके यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर बेनके यांनी माध्यमाशी बोलतांना “विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना काहीही घडू शकतं. कदचित दादा (अजित पवार) आणि साहेब (शरद पवार) एकत्र येतील, असे विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
यावेळी बोलतांना बेनके म्हणाले की,”विधानसभा निवडणुकीला अजून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना काहीही घडू शकतं. त्यावर आता भाष्य करण्यात काही अर्थ आहे का. यदाकदाचित आम्ही महायुती म्हणून पुढे जात आहोत, पण जागा वाटपावरून काहीही होऊ शकतं. तसेच कदचित दादा (अजित पवार) आणि साहेब (शरद पवार) एकत्र येऊ शकतात. मी एक छोटा घटक आहे. राज्यातील २८८ आमदारांपैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे राजकारणात पुढे जात असताना पुढे काय घडेल, हे मी आता कसे सांगू शकतो”, असे अतुल बेनके यांनी म्हटले.
पुढे बोलतांना बेनके म्हणाले की,”माझ्या या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असे मला वाटते. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्यासाठी दैवत आहेत. गेल्या ४० वर्षांचा बेनके परिवाराचा राजकीय इतिहास हा शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील यांच्या आशीर्वादाने चालू राहिलेला आहे. सध्या राजकीय स्थित्यंतरे झाली. सहा महिन्यांच्या तटस्थतेच्या भूमिकेनंतर आता जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अजित पवार यांच्यासोबत राहणे पसंत करेन”, असेही बेनके यांनी म्हटले.
शरद पवार भेटीवर नेमकं काय म्हणाले?
आमदार अतुल बेनके यांनी भेट घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले की, “ते आता कोणत्या पक्षात आहेत? मला ते अजित पवार गटात आहेत, याची कल्पना नाही. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे. त्यामुळे यावर फार चर्चा नको”, असे शरद पवारांनी म्हटले. दरम्यान आमदार अतुल बेनके यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे बेनके हे अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी ही भेट घडली होती. यानंतर आता या भेटीला खुद्द शरद पवार यांनीही दुजोरा दिला आहे.