महाविद्यालयीन विद्यार्थीनींचा पाठलाग करणार्या रोडरोमीओची दुचाकी संतप्त जमावाने जाळल्याची घटना काल श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे घडली. या घटनेत एकास नागरिकांनी पाठलाग करून ताब्यात घेतले तर दुसरा पसार झाला.
रोडरोमीओला पकडल्याचे समजताच जमाव जमा झाला होता. काही सुज्ञ नागरीकांनी पकडलेल्या एकास गाळ्यात डांबून ठेवले. परंतु संतप्त जमावाने त्या रोडरोमीओची मोटारसायकल जाळली. व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
टाकळीभान येथील विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे महाविद्यालयाची सुटी झाल्यानंतर एसटीने घरी परतत असताना दोन रोडरोमीओ एसटीचा पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्याने त्या विद्यार्थिनींनी आपल्या पालकांशी संपर्क करून प्रकार सांगितला. पालकांनी लागलीच धाव घेत त्या एसटी पर्यंत पोहचले तर ते दोन रोडरोमीओ एसटीचा पाठलाग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पालकांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करत त्यांना पकडण्यात आले. परंतु एकाने पालकांना हुल देत पलायन केले. व एक जण पालकांच्या हाती लागला. या पालकांनी त्या रोडरोमीओस मोटार सायकलसह टाकळीभान येथे पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी नेले. परंतु तेथे पोलीस उपलब्ध नसल्याने, रोडरोमीओ पकडल्याचे समजताच तेथे मोठा जमाव जमा झाला. संतप्त जमाकडून होणारी मारहाण टाळण्यासाठी काहींनी एकास गाळ्यात बंद करून ठेवले.
हा प्रकार समजताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय निकम, हवालदार राजु त्रिभुवन, कॉन्स्टेबल संतोष कराळे, कॉन्स्टेबल विठ्ठल थोरात हे घटनास्थळी दाखल झाले. त्या पाठोपाठ पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुंजे व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, हवालदार दादासाहेब लोढे, प्रशांत रणनवरे आदींसह मोठा फौजफाटा दाखल झाला. यावेळी रोडरोमीओस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यानच्या काळात टाकळीभान येथील संतप्त जमावाने त्या रोडरोमीओच्या दुचाकीची मोडतोड करत राज्यमार्गावर जाळली. रात्री उशीरापर्यंत तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.






