नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याला मुंबई न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यशश्रीच्या हत्येनंतर दाऊद शेखला चौथ्या दिवशी कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक करण्यात आली होती.
त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने यशश्रीच्या हत्येची कबुली दिली आहे. यानंतर आज आरोपी दाऊद शेखला मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावत त्याची रवानगी कारागृहात केली आहे. तसेच आरोपी दाऊद शेखविरोधात ४ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण महराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणी उरण पोलिसांनी आरोपी दाऊद शेखला मंगळवारी अटक केली. कर्नाटकातील गुलबर्गा येथून दाऊद शेखला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला उरण येथे पोलिस घेऊन आले. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता दाऊदने गुन्ह्याची कबुली दिली.लग्नाला नकार दिला म्हणून यशश्रीची हत्या केली असल्याचे त्याने कबूल केले.यानंतर दाऊद विरोधात पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तसेच यशश्रीला शिवीगाळ केल्याप्रकरणी दाऊद शेखविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशश्री शिंदे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार आहे. ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम हे सदर प्रकरण हाताळणार आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांसोबत चर्चेनंतर याविषयीची माहिती दिली होती. तसेच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यशश्री आणि दाऊदमध्ये काही वर्षांपासून मैत्रीचे संबंध
यशश्री शिंदे आणि दाऊद शेख एकमेकांना ओळखत होते. यशश्री उरणमध्ये ज्याठिकाणी राहत होती त्याठिकाणीच दाऊद देखील राहत होता. त्यांच्यामध्ये ३ ते ४ वर्षांपासून मैत्री होती. पण २०१९ मध्ये यशश्रीच्या कुटुंबीयांनी त्याच्याविरोधात तक्रार केली होती. त्यावेळी त्याच्याविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दाऊदला पोलिसांनी अटक केल्यानंतर तो जेलमध्येही गेला होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर तो कर्नाटकला निघून गेला होता. पण पुन्हा यशश्री आणि दाऊद यांच्यामध्ये संपर्क सुरू झाला होता. दोघेही एकमेकांना कॉल करत होते. दाऊद उरणमध्ये आल्यानंतर त्याने यशश्रीशी फोनद्वारे संपर्क केला. त्यावेळी दोघांनी भेटायचे देखील ठरले होते. या भेटीवेळी यशश्रीने लग्नाला नकार दिला त्यामुळे संतप्त झालेल्या दाऊदने तिची हत्या केली.