महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आजपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सुरु झाली आहे. यावेळी अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेस उपस्थित असणाऱ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावरून मार्गदर्शन करतांना विविध विषयांवर भाष्य केले.
यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की,”राज्य सरकारच्या विविध योजनाच्या माध्यमातून सर्वांना फायदा होत आहे. शेतकरी वर्ग, महिला, विद्यार्थीं व युवक वर्गाला या योजनेतून मदत होणार आहे. महायुतीचे सरकार हे काम करणारे सरकार आहे. विरोधकांकडून केल्या जात असलेल्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. तसेच महिलांसाठी आणलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा पहिला हफ्ता १७ ऑगस्टला मिळणार असून दोन महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत”, असे अजित पवारांनी सांगितले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, “राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर विरोधकांनी लाडक्या भावाला काहीच मिळाले नाही, अशी ओरड सुरु केली होती.मात्र, आमच्या सरकारने लाडक्या भावांसाठीही योजना सुरु केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता शेतीचे वीजबिल भरावे लागणार नाही.तसेच आतापर्यंत थकबाकी असलेले बिल देखील भरण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या सौरपंप योजनेमुळे यापुढे शेतकऱ्यांना वीजेसाठी अवलंबून राहावे लागणार नाही. सौरउर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता सौरपंपाचा वापर करुन आता शेतीला पाणी देता येईल. याचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे”, असेही अजित पवारांनी म्हटले.
पवार पुढे बोलतांना म्हणाले की,”विरोधक म्हणतात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ तात्पुरती आहे. मात्र, पुढील पाच वर्षे ही योजना सुरु राहील, हा अजितदादाचा वादा आहे. मी दहा वर्षे राज्याचा अर्थमंत्री राहिलो असून १० अर्थसंकल्प मांडले आहेत. त्यामुळे कुठे बचत करुन योजनेला पैसे देता येतात, हे मला माहिती आहे. या योजनेवर वर्षभरासाठी आपण ४६ हजार कोटी रुपये खर्च करत आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी उशीर होत आहे. पण महिलांना त्यांचा हक्क मिळेल, त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल”, असे अजित पवारांनी म्हणाले.
कालच सहा हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आलोय
राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना गावागावात, पाड्यावर, वाडीवस्तीवर सगळीकडे माहिती झाली आहे. आतापर्यंत सव्वा कोटी महिला योजनेसाठी पात्र ठरल्या असून १७ तारखेपर्यंत हा आकडा दीड ते दोन कोटींवर जाईल. कालच मी ६ हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करुन आज तुम्हाला भेटायला आलोय असे अजित पवारांनी म्हटले.
महिलांकडून उपमुख्यमंत्री पवारांचे स्वागत
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी राज्यभरातून सव्वा कोटी महिला भगिनींनी अर्ज केले आहेत. राज्य सरकारकडून रक्षाबंधन सणाच्या अगोदरच महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये देण्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे १७ ऑगस्ट रोजी १ कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा हफ्ता म्हणून ३००० रुपये मिळणार आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली. तसेच येथील महिलांनी अजित पवारांना रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर राख्या बांधत त्यांचे स्वागत केले.