श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील दोन महाविद्यालयांमध्ये खो-खो मॅच सुरू असताना, जुन्या वादातून एका महाविद्यालयाच्या संघाने स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पहात असलेल्या प्राध्यापकास लाठी काठीने बेदम मारहाण केली. सदर घटना शनिवारी घडली. या प्रकरणाची पोलीस ठाण्यात नोंद देखील नाही. शहरात एका नामांकित शैक्षणिक संकुलामध्ये शनिवारी महाविद्यालय अंतर्गत तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा सुरू होत्या. खो-खो मॅच सुरू असताना एका नामांकित महाविद्यालयाचा संघ पराभवाच्या छायेखाली असताना त्यातील काही तरुणांनी स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहत असलेल्या दुसर्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकास बेदम मारहाण करण्यास प्रारंभ केला.
तो वाद महाविद्यालयाच्या वरिष्ठांनी मध्यस्थी करून मिटविला. यामध्ये जखमी झालेल्या ‘त्या’ प्राध्यापकास येथील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार जुन्या वादातून झाला असल्याची माहिती त्या प्राध्यापकाच्या नातेवाईकांनी दिली. खरेतर एवढी गंभीर घटना महाविद्यालयाच्या आवारात घडूनही त्या महाविद्यालयाच्या वरिष्ठांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यातील दोषींना शासन व्हायला पाहीजे, अशी भूमिका जखमी प्राध्यापकाच्या काही नातेवाईकांनी घेतली आहे. परंतु घटना घडून दोन दिवस उलटले तरीही कोणत्याही प्रकारची नोंद पोलीस ठाण्यात झालेली नाही. शिक्षणाची पंढरी समजल्या जाणार्या या शिक्षण संकुलात अशा घटना घडायला नको, त्यासाठी वरिष्ठांनी लक्ष घालायला पाहिजे, अशी मागणी होत आहे.