श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी अशोक उपाध्ये यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ काल श्रीरामपूर शहर सर्वपक्षियांच्यावतीने बंद ठेवण्यात आले. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात सर्वपक्षिय पदाधिकार्यांनी ठिय्या दिला. यावेळी अनेकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. काल मंगळवारी ऐन संक्रात सणाच्या दिवशी शहरातील मेन रोड परिसरात झालेल्या या हल्ल्याच्या घटनेमुळे शहरात काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. यावेळी मेनरोड परिसरातील धृवी लाईफस्टाईल समोर मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे पुढील काही वेळातच शहरातील मेनरोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड, बसस्थानक परिसर, नेवासा रोड, संगमनेर रोड परिसरातील दुकाने बंद करण्यात आली. व्यापारी व राजकीय पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक यांनी तत्काळ शहर पोलीस ठाण्यात जाऊन सदर हल्ल्याचा तीव्र निषेध करत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी निवडणूक काळात आपल्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेला उजाळा देत, शहर व तालुक्यात वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी केली. येथील व्यापारी व नागरिकांसाठी शहरात दहशतमुक्त वातावरण निर्माण करण्याचा आग्रह पोलिसांकडे केला. आमदार हेमंत ओगले म्हणाले, मागील आठवड्यात खैरी निमगाव येथील एकाचे दोन लाख रुपये लुटले गेले. चरण त्रिभुवन यांच्यासह संजय यादव यांच्यावर देखील हल्ला झाला. अशा घटना घडत असताना पोलिसांनी अशा प्रवृत्ती विरोधात कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे. नागरिक पोलिसांकडे काही अपेक्षा घेऊन येतात. त्या पूर्ण होणे गरजेचे आहे. अशोक उपाध्ये यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे श्रीरामपूरकरांवर झालेला हल्ला आहे. वाढती गुन्हेगारी पाहता श्रीरामपूरला बीडचे स्वरूप येत आहे. त्यामुळे पोलिसांनी संध्याकाळपर्यंत हल्लेखोरांना अटक करावी अन्यथा पोलीस ठाण्यात बसू नये, पोलिसांची आपली भूमिका जाहीर करावी. त्यानंतर आम्ही सर्व राजकीय पदाधिकारी रस्त्यावर येऊन शहरातील शांतता राखण्यासाठी काम करू, असा इशारा आ. हेमंत ओगले दिला.
माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक म्हणाल्या, शहरात अशा हल्ल्याच्या घटना होणे गंभीर आहे. राजकारणात टीका-टिप्पणी करणे यास सीमारेषा असते. मात्र, टोकाचे पाऊल उचलून हल्ला किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागणे चुकीचे आहे. शहरात शांतता ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. सर्व श्रीरामपूरकर उपाध्ये यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आहे. पोलिसांनी वेळीच लक्ष घालून अशा प्रवृत्तींना रोखले पाहिजे. जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी उपाध्ये यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत, आजचा हल्ला एका व्यापार्यावर झालेला नसून श्रीरामपुरातील श्रीराम मंदिर स्थापनेसह श्रीराम नवमी उत्सवाचे संस्थापक यांच्या कुटुंबावर झालेला हल्ला आहे. काही लोकांना व्यवसाय करण्यासाठी राजकारणात येऊन संरक्षण हवे असते. अवैध धंद्यांवर पांघरूण घालण्यासाठी राजकारणाचे भांडवल पाहिजे असते. हिंदू म्हणून हिंदूंवरच अत्याचार करणे चुकीचे आहे. त्यामुळे हिंदू समाज बांधवांच्या हिंदुत्वाची परीक्षा घेऊ नये. त्यामुळे पोलिसांनी वेळीच गुन्हेगारी रोखावी. आम्ही सर्वजण श्रीरामपूरकर म्हणून उपाध्ये यांच्यासोबत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
भाजपचे प्रकाश चित्ते म्हणाले, हिंदुत्वाचे ढोंग करणारे हिंदूंवरच हल्ले करत आहेत, शहरात संजय यादव यांच्यावर झालेला हल्ला, मागील काही दिवसांपूर्वी सुनील करपे यांच्यावर झालेला हल्ला, चरण त्रिभूवन यांच्यावर झालेला हल्ला आणि आज अशोक उपाध्ये यांच्यावर झालेला हल्ला हा हिंदू गुंडांनी केला आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली पैसे कमविण्याचे काम सध्या सुरू आहे. हे सर्व भविष्यात धोकादायक होऊ शकते म्हणून याला वेळीच आवर घालायला हवा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी भाजपाचे संजय यादव, चरण त्रिभुवन यांनी देखील मागील काही दिवसांपूर्वी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रसंग पोलीस व नागरिकांसमोर सांगितला.
याप्रसंगी शिवसेना (उबाठा) चे शहराध्यक्ष संजय छल्लारे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, सचिन गुजर, राष्ट्रवादीचे लकी शेठी, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, काँग्रेसचे ज्ञानेश्वर मुरकुटे, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, अशोक थोरे, अहमदभाई जहागीरदार, सलीम पठाण, ज्येष्ठ नेते नाना पाटील यांनी सदर हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी केली. या निषेध सभेप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, कामगार नेते जीवन सुरवडे यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या आवरात एकत्र येत आपल्या भावना व्यक्त केल्या.