श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. २ मध्ये घासगल्ली भागात काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही बाजूंनी एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली. तिघांना चाकुने वार करून जबर जखमी करण्यात आले. तर एकाने त्याच्या जवळील कटट्यातून हवेत गोळीबार केला. या प्रकाराने परिसरात घबराट पसरली आहे.
राहाता तालुक्यात इस्तेमा कार्यक्रमात वादावादी झाली होती. ते भांडण तेथेच मिटविण्यात आले होते. पुन्हा गैरसमज नको म्हणून काल शुक्रवारी सायंकाळी शहरातील वॉर्ड नं. २ मध्ये घासगल्ली भागात मिटवा मिटवी करत असतानाच दोन्ही गट समोरासमोर आल्याने एकमेकांमध्ये वादावादी सुरू झाली. नंतर हे प्रकरण हातघाईवर आले नी अचानक तुफान हाणामारी सुरू झाली. काहींनी चाकूने वार केले.
यात कय्युम कासम शेख, आयान जमील पठाण, मोहसीन शकील शेख हे तिघे जबर जखमी झाले आहेत. यावेळी एकाने हवेत गोळीबार केल्याची माहिती घटनास्थळजवळील नागरिकांनी दिली. मात्र पोलिसांकडून त्यास दुजोरा मिळू शकला नाही. या घटनेतील तीन जखमींवर येथील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. एकजण चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक नितीन देशमुख हे पोलीस फोजफाटा घेऊन दाखल होताच या टोळक्यांची पळापळ झाली. याप्रकरणी पोलीस तपास करत असून एक टोळके घासगल्ली, वॉर्ड नं. २ तर दुसरे अशोकनगर परिसरातील असल्याचे समजते. मिटविणारा व बोलावणारा कोण होता? हे पोलीस शोधत आहेत.
दरम्यान, नक्की हवेत गोळीबार झाला का? गोळीबार गावठी कट्ट्यातून झाला का? छऱ्याच्या बंदूकीतून झाला? याची चौकशी पोलीस करीत आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची कोणतीही नोंद करण्यात असलेली नव्हती.