नगरपालिकेने सुरू केलेली शहरातील विविध रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम काल दुसर्या दिवशी देखील पूर्ण ताकदीनिशी राबविण्यात आली. रेल्वे अंडरग्राउंडपासून गोंधवणी गावापर्यंत संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूने अतिक्रमण मुक्त करण्यात आला. गेली पन्नास वर्षांपासून निर्माण झालेली अतिक्रमणे काल एकाच दिवसांत जमीनदोस्त करण्यात आली. काही ठिकाणी पोलीस बळाचा वापर देखील करावा लागला. काढण्यात आलेल्या अतिक्रमणांच्या जागेवर पुन्हा जर अतिक्रमणे करण्याचा प्रयत्न झाला तर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिला.
काल सकाळी 10 वाजता नगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, जेसीबी व ट्रॅक्टरच्या फौजफाट्यासह सय्यद बाबा चौकात दाखल झाले. जामा मशीद लेन मधील दुकानदारांची पुढे आलेली अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने नामशेष करण्यात आली. गोंधवणी रोडवरची अतिक्रमणे आज हटविण्यात येणार असल्याची वार्ता आदल्या दिवशीच पसरली होती. त्यानुसार सय्यद बाबा चौकापासून गोंधवणी गावापर्यंतच्या सर्वच लोकांनी आपापली दुकाने रात्री रिकामी केली होती. तर बर्याच लोकांनी आपले शेड काढून घेतले होते. काल सकाळी ही मोहीम सुरू झाल्यानंतर अतिक्रमणधारकांनी आलेल्या अधिकार्यांना सहकार्य करत आपापली अतिक्रमणे काढली. जी दुकाने, टपर्या, शेड अस्तित्वात होते ते जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले.
गोंधवणी पुलाजवळील नेहरूनगर मधील अतिक्रमित गाळे तसेच भंगारचे दुकान हे देखील भुईसपाट करण्यात आले. गोंधवणी पुलापासून पुढे पेट्रोल पंपापासून पाण्याच्या टाकीपर्यंत असलेली सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करताना या ठिकाणी राहणार्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. येथील दुकानदारांनी परवा रात्रीच आपली दुकाने रिकामी केली होती. सर्वत्र विटा मातीचे ढीग आणि पत्र्याचे गाळे असल्याने अँगल व पत्रे यांचा खच दिसत होता.
गोंधवणी रस्ता हा अतिक्रमणामुळे पूर्णपणे व्यापला गेला होता. परंतु काल तो मोकळा करण्यात आला. श्रीरामपूर एज्यूकेशन सोसायटी शाळेची इमारत काल पहिल्यांदा रस्त्यावरून दिसायला लागली. त्या बाजूची सर्व दुकाने, टपर्या काढण्यात आल्या. नगरपालिका लेबर कॉलनी समोरील अतिक्रमणे देखील काढण्यात आली. त्यामुळे पुढे बांधलेली घरकुल वसाहत मोकळी झाली. शहरातील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गेली अनेक वर्षे अतिक्रमणे वाढली होती. राज्य मार्ग असूनही हा रस्ता पूर्णपणे झाकला गेला होता. तो काल मोकळा झाला.
मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, उपमुख्याधिकारी महेंद्र तापकिरे, पालिकेचे बांधकाम विभागाचे अभियंता सूर्यकांत गवळी, किरण जोशी, पप्पू परदेशी व इतर सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे सर्व सहकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवरे, समाधान सोळुंके व इतर कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
पुनर्वसन करण्याची मागणी
गोंधवणी रोडवरील सर्व दुकानदार हातावर पोट भरणारे आहेत. त्यांची दुकाने नष्ट झाल्याने त्यांच्यापुढे आता रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत नगरपालिका आणि आजी-माजी आमदार व इतर सर्व राजकीय पक्षाच्या पुढार्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावे व ज्या दुकानदारांचे रोजी रोटीची साधने नष्ट झाली आहेत, त्यांना पुनर्वसित करावे, अशी मागणी या दुकानदारांनी केली आहे.
महादेव मंदिर परिसरात तणाव
महादेव मंदिराकडे जाणार्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यावरून तसेच एका दुकानदाराने आत्मदहनाची धमकी दिल्याने आणि मोठा जमाव जमल्याने काल सायंकाळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. महादेव मंदिर परिसरात रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास पालिका प्रशासनाने सुरूवात केली होती. पण सायंकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास ही मोहीम सुरू असताना एका तरुणाने आत्मदहनाची धमकी दिली. त्यामुळे प्रशासनाने पोलिसांचा ताफा बोलावून घेतला. तसेच या भागात एकाने अतिक्रमण न काढल्याने काहींनी त्यावर आक्षेप घेतला. नियम सर्वांना सारखाच लावावा असे स्पष्ट करत प्रशासनावर रोष व्यक्त केला. त्यामुळे अंधार पडल्याच्या कारणावरून ही मोहीम काल थांबविण्यात आली. पण आज सकाळपर्यंत अतिक्रमणधारकांनी आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत अन्यथा सकाळी 10 वाजल्यापासून कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
नेवासा रोडवरील अतिक्रमणे दुकानदारांनी स्वतःहून काढली
बेलापूर आणि गोंधवणी रोडवरील अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात काढण्यात आल्यानंतर नेवासा रोडवरील दुकानदारांनी स्वतः अतिक्रमणे काढण्यास सुरूवात केली. या कामास काल कमालीचा वेग आला होता. आपल्या मालाचे नुकसान होऊ नये यासाठी जो तो दुःखद अंत:करणाने आपल्या दुकानातील मालवाहतूक रिक्षा, टेम्पो व इतर वाहनांनी घरी, गोदामात अथवा अन्य ठिकाणी हलविण्याचे काम सुरू होते. काहींनी मार्कींग करून दिल्याप्रमाणे आपली दुकाने लहान केली आहेत.
मौलाना आझाद चौकापासून गौसिया मशिदीपर्यंतची अतिक्रमणे काढणार
नगरपालिकेने सुरू केलेली ही मोहीम पंधरा दिवस तरी सुरू राहणार आहे. यामध्ये मुख्य रस्त्यांसह उपनगरातील इतर डीपी रस्ते सुद्धा मोकळे करण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून काल मौलाना आझाद चौकापासून गौसिया मशिदीपर्यंतच्या भागावर मार्किंग करण्यात आली. तेथे सुद्धा लवकरच अतिक्रमण काढण्यात येणार आहे.