श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्याला पूर्ण दाबाने वीज उपलब्ध होण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या 220 के. व्ही. उच्चदाब क्षमतेच्या उपकेंद्र उभारणीसाठी 45 कोटी रुपये खर्चाच्या कामासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बहूप्रलंबित विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. श्रीरामपूर येथील औद्योगिक वसाहतीत ई -3 प्लॉटमध्ये या दीड एकर विस्तारित जागेत उपकेंद्राची उभारणी होणार असून संभाजीनगर येथील आयडिया इलेक्ट्रिकल्स अॅण्ड इंजिनीअरिंग कंपनीला या संदर्भात लेटर ऑफ इंडेन म्हणजेच कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.त्यामुळे पुढील महिनाभरात हे काम सुरू होणार आहे. सद्यस्थितीत श्रीरामपूर सूतगिरणी येथे अल्प 33/11 के.व्ही. क्षमतेचे रोहित्र कार्यान्वित आहे. श्रीरामपूर शहर व तालुक्याला बाभळेश्वर आणि नेवासा येथून सध्या अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. परिणामी शेतकरी, उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांना त्याचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो.
पढेगाव येथील उडान व नेताजी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक जितेंद्र तोरणे आणि कृषी व्यावसायिक रणजित बनकर यांच्या पुढाकाराने या प्रश्नावर 2023 मध्ये बेलापूर येथे मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. पुढे विखेंच्या प्रयत्नानेच या कामाला गती मिळाली आणि महापारेषण कंपनीने ऑगस्ट 2024 मध्ये यासाठी औद्योगिक वसाहतीत जागा खरेदी केली. तरीही पुन्हा हे काम मागे पडले होते. त्यासाठी आंदोलक प्रतिनिधिंनी नाशिक व मुंबईशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला.
सततच्या पाठपुराव्याने अखेर नोव्हेंबर 2024 मध्ये उच्च दाब क्षमतेच्या संस्थेची या कामासाठी निविदा निघाली.त्यात संभाजीनगरच्या आयडिया इलेक्ट्रिकलस अॅण्ड इंजिनिअर्स या कंपनीला हे काम मिळाले असून आता कार्यारंभ आदेशही ठेकेदार कंपनीला दिला आहे.त्यामुळे आता या कामाला लवकरच सुरुवात होणार असून सुमारे 50 वर्षे रखडलेला हा प्रश्न मार्गी लागणार आहे.