श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील हरेगाव येथील कारखान्याचे स्क्रॅब मटेरीयल काढण्याचे काम सुरु असताना, अंगावर टाकीचे अँगल पडून एक तरुण ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करुन त्याला पुढील उपचासाठी लोणी येथे हलविण्यात आले आहे. रुपेश योहान कसबे (वय 20) रा. अशोकनगर, (निपाणीवाडगाव) ता. श्रीरामपूर असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. हरेगाव कारखान्याचे स्क्रॅब मटेरीयल काढण्याचा ठेका अशोकनगर येथील भैय्या उर्फ रईस सय्यद नावाच्या ठेकेदाराने घेतला आहे. त्यामुळे हे स्क्रॅब मटेरीयल काढण्यासाठी रुपेश कसबे या तरुणासह चार जण त्याठिकाणी काम करत होते.
अचानक कारखान्याच्या पाण्याच्या टाकीचे अँगल अंगावर पडल्याने त्यातील दोघे जखमी झाले. त्यांना तत्काळ साखर कामगार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. परंतु रुपेश कसबे या तरुणास वैद्यकीय अधिकार्यांनी उपचारापुर्वीच मयत घोषीत केले. तर निलेश बाबासाहेब भोसले (वय 35, रा. मराठी शाळेजवळ, अशोकनगर) याच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी त्याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत रुपेश कसबे हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. त्याचे वडील योहान कसबे हे ट्रक चालक म्हणून काम करतात. मयत रुपेशवर काल मंगळवारी सायंकाळी अशोकनगर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदर घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधिन सहाय्यक पोलिस अधिक्षक रॉबीन बन्सल व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी जावून पहाणी केली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.