अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथाकाने श्रीरामपूर व शेवगाव येथील वाळू तस्करांवर संयुक्तपणे धडक कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी सुमारे 40 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तीन तर शेवगाव पोेलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यामधील बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून वाहतूक करणार्यांची माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, गणेश भिंगारदे, रमीजराजा आत्तार, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ व बाळासाहेब खेडकर यांचे 02 पथक तयार करून श्रीरामपूर व शेवगाव येथील अवैध वाळू वाहतूक करणार्यांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना देऊन पथके रवाना केली होती.
दि. 15 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले परि. पोलीस अधीक्षक रॉबीन बन्सल व श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून वाहतूक करणार्या इसमांची बातमीदारामार्फत माहिती काढून पंचासमक्ष 4 ठिकाणी छापे टाकले. पथकाने बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून वाहतूक करणार्या 15 आरोपींविरूध्द 4 गुन्हे दाखल करून 40 लाख 20 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात बीएनएसचे कलम 303 (2) प्रमाणे तेरा आरोपींवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून 35 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तर शेवगाव पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुध्द बीएनएस 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 5 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.