श्रीरामपूर (प्रतिनिधी)
शहरातील एका इमारतीच्या तळ मजल्याच्या खोलीत भरदुपारी २ ते ३ च्या सुमारास एका ३२ वर्षाच्या तरुणीवर नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एका रेल्वे पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानदेव आढाव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बलात्कार करणारा आरोपी हा रेल्वे पोलिसांत नोकरीला असून त्याने पीडित तरुणीला विश्वासात घेवून, तिचा मोबाईल नंबर घेत त्यावर वेळोवेळी मेसेज करून तुला नोकरी लावून देतो, असे म्हणत बलात्कार केला.
पीडिता राहुरी तालुक्यातील असून तिने श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमांसह अनुसूचित जातीजमाती संरक्षण कायद्यान्वये बलात्कार व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे हे पुढील तपास करत आहेत.
खंडणी दिली नाही म्हणून गुन्हा
दरम्यान सदर महिलेने व तिच्या साथीदारांनी माझ्याकडे एक कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती. त्यांनी मागितलेली रक्कम दिली नाही म्हणून मला फसवून माझ्याविरुध्द खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे तक्रारदार ज्ञानदेव आढाव यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. सर्व बाबींची तपासणी करून माझ्याविरुध्दचा दाखल झालेला खोटा गुन्हा रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.