श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
परमीट रुम व वाईन शॉप यांच्यावरील व्हॅट टॅक्स बाबतच्या तफावतीच्या पध्दतीमुळे बेकायदेशीर मद्य विक्रीत वाढ होवून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोप श्रीरामपूर तालुका लिकर असोसिएशनचे माजी सल्लागार सुनील मुथा यांनी केला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात श्री.मुथा यांनी म्हटले आहे की, परमिट धारकांना विक्री केलेल्या मद्यावर दहा टक्के व्हॅट टॅक्स भरावा लागतो. परंतु वाईन शॉप आणि बिअर शॉपीमधून विक्री केलेल्या मद्यावर मात्र व्हॅट टॅक्स भरावा लागत नाही. परिणामी ग्राहकांना परमिटरूम मधील मद्यावर पंचवीस ते तीस रुपये प्रतिबाटली मागे जादा मोजावे लागतात. किमतीतील या तफावतीमुळे ग्राहकांनी परमिट रूमकडे पाठ फिरवली असून यामुळे परमिट रुम चालकांना दैनंदिन खर्च भागवणेही अवघड होऊन बसले आहे.
वाईन शॉप मधून आणलेल्या मद्यावर टॅक्स भरावा लागत नसल्याने बहुतांश परमिट रूम चालकही अधिकृत विक्रेत्यांकडून (ट्रेड) मद्य घेण्याऐवजी सर्रास वाईन शॉपमधून मद्य खरेदी करून विकत आहेत. त्यांना असे बेकायदेशीर कृत्य करण्यास शासनच भाग पाडत आहे. तसेच वाईन शॉपमध्ये कमी किमतीत मिळणार्या मद्यामुळे बेकायदेशीर मद्य विक्री वाढली असून खेडोपाडी आणि गल्लोगल्ली झालेल्या हॉटेल्समधून सर्रास अवैध मद्य विक्री केली जात आहे. परिणामी लाखो रुपये फी आणि विविध टॅक्स भरण्यापेक्षा चिरीमिरी देऊन अवैध हॉटेल चालविणे सोयीचे असल्याची भावना परमिट रूम धारकांमध्ये वाढीस लागली आहे. यामुळे बहुतांश परमिट धारकांनी परवान्याचे नूतनीकरण अद्याप केलेले नाही. परिणामी राज्य शासनास कोट्यवधीच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे, असे श्री. मुथा यांनी म्हटले आहे.
शासनाच्या मद्य धोरणाच्या निषेधार्थ 20 मार्च रोजी राज्यातील परवानाधारक हॉटेल चालकांनी बंद पुकारला होता. या पार्श्वभूमीवर आमदार वसंत खंडेलवाल यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार व उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत हॉटेल चालकांची चर्चा झाली. त्यावर एक-दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्रातील परमिट रूम धारकांचे लक्ष लागून राहिले आहे.