श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील एका गुटखा व तंबाखू विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. त्याच्याकडून 1 लाख 24 हजार 334 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 25 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती घेत असताना, त्यांना शहरात वॉर्ड नं. 2 मधील बीफ मार्केट येथे तारा पान कॉर्नर नावाच्या पान टपरीमध्ये गुटखा पानमसाल्याची व सुगंधीत तंबाखुचा साठा करून विक्री चालू असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार पथकातील पोलीस अंमलदारांनी तत्काळ घटनास्थळी जावून टपरीची तपासणी केली असता त्या ठिकाणाहून 1 लाख 24 हजार 334 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
यामध्ये विमल पानमसाला, व्ही-1 तंबाखु पुड्या, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, शॉट 999 तंबाखु, हिरा पानमसाला, महा रॉयल 717 तंबाखु, एक मोबाईल व सुझुकी कंपनीची मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या पानटपरीत बसलेल्या मुजम्मिल रफिक कुरेशी (वय 33, रा.कुरेशी जमात खाना, वॉर्ड नं.02) यास ताब्यात घेतले. त्याने सदरचा पान स्टॉल त्याचा व त्याचा भाऊ आजम रफिक कुरेशी (रा.कुरेशी जमात खाना, वॉर्ड नं.02) यांचा असल्याचे सांगितले.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बीएनएस 2023 चे कलम 123, 223, 274, 275, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करत आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या सुचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, गणेश धोत्रे, रणजीत जाधव, भगवान थोरात व रमीजराजा अत्तार आदींनी केली.