नाऊर |वार्ताहर| Naur
दुचाकीचा कट मारल्याच्या वादातून सिनेस्टाईलने पाठलाग करत नाऊरच्या दोघा तरुणांवर चॉपरने वार केल्याची घटना काल नाऊर चौफुली येथे घडली. संतप्त ग्रामस्थांनी पाठलाग करणार्यांच्या दोन्ही दुचाकी जाळून टाकल्या. हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले.
या हल्ल्यात महेश संजय शिंदे (वय 22), शिवम जालिंदर शिंदे (वय 20) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल महेश व शिवम हे श्रीरामपूरहून दुकानचे सामान खरेदी करून गावाकडे परतत असताना दुचाकीचा कट मारल्यावरून वाद झाला. त्यानंतर महेश व शिवम हे हरेगाव मार्गे नाऊरकडे जात असताना अज्ञात तरुणांनी त्यांचा पाठलाग करत नाऊर चौफुली येथे चालू गाडीवर एकाच्या पाठीवर तर दुसर्याच्या डोळ्याजवळ आणि डोक्यावर चॉपर सारख्या टोकदार हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे.
घटनेची माहिती समजताच गावातील शेकडो ग्रामस्थांनी चौकाकडे धाव घेत, दुचाकीवरून आलेल्या तरुणांच्या दोन दुचाकी जाळून टाकल्या आणि दोघांना पकडून येथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर इतर काही तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हे दोघे तरुण गावाकडे परतत असताना शहरातील काही तरुण पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्याने महेश शिंदे व शिवम शिंदे यांनी गाडी वेगात नाऊर चौफुलीपर्यंत आणली. मात्र, पाठलाग करणार्या अनोळखी तरुणांनी चौकातील स्पीड ब्रेकरवर महेश शिंदे यांच्या पाठीत वार केला आणि शिवम शिंदे यांच्या डोळ्याखाली व डोक्यात वार केल्याने त्यांनी मोठ्याने आरडाओरड केला.
यावेळी गावातील शेकडो ग्रामस्थांनी चौकाकडे धाव घेऊन बाहेरून आलेल्या दोन तरुणांना पकडले आणि त्यांच्याकडील दोन दुचाकी जाळून टाकल्या. घटनेचे गंभीर्य लक्षात घेवून अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. डौले यांनी खबरदारी घेत नाऊर येथे येऊन जखमी तरूणांना घेऊन रुग्णालयात दाखल केले. या संदर्भात जबाब घेण्याचे काम सुरू होते.