श्रीरामपूर (प्रतिनिधी) – बेलापूर रोडवर शनिवारी मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून रस्त्यावरील लोखंडी खांबाचेही तुकडे झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर येथील पारिजात कोल्ड्रींग्सचे चालक विजय दळवी यांचा मुलगा अमीत दळवी याचा विवाह शनिवारी दुपारी पार पडला. संध्याकाळी पाहुण्यांना वाटी लावल्यानंतर अमीतचा भाऊ सुमीत दळवी (वय ३२) व त्याचे दोन मित्र बेलापूरकडे नातेवाईकांकडे गेले होते. रात्री १२.३० च्या सुमारास ते टाटा नॅक्सॉन (MH 17 CJ 0027) गाडीतून श्रीरामपूरकडे परतत असताना जुन्या वडाच्या झाडाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी थेट डिव्हायडरवरील लोखंडी खांबावर आदळली आणि दोन ते तीन पलट्या घेतली.
अपघातात सुमीत दळवी यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, लग्नाच्या समारंभासाठी परिधान केलेल्या कपड्यांमध्येच त्यांचा मृतदेह रस्त्यावर पडलेला दिसून आला, हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. अपघाताची माहिती मिळताच सपोनि समाधान सोळंके यांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीत असलेले अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना लोणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नवविवाहित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे






