श्रीरामपूर:
“प्रामाणिकपणे काम करा आणि सन्मानाने जगा,” हे ब्रीदवाक्य आज श्रीरामपूरमधील तरुण पिढीसाठी केवळ पुस्तकी शब्द उरले आहेत की काय, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, नियमांचे पालन करणाऱ्या प्रामाणिक व्यवसायिकांपेक्षा, भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणाऱ्यांनाच राजाश्रय मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रामाणिकपणाची शिक्षा आणि भ्रष्टाचाराचा उदोउदो
आजचा सुशिक्षित तरुण जेव्हा स्वतःचा प्रामाणिक व्यवसाय सुरू करतो, तेव्हा त्याला पावलोपावली प्रशासकीय अडथळ्यांचा सामना करावा लागतो. धक्कादायक वास्तव हे आहे की, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पैशाच्या जोरावर भ्रष्ट व्यवस्थेला हाताशी धरून मोकळे सुटतात; मात्र जो तरुण नियमाने चालतो, त्याला मूलभूत हक्कांसाठीही संघर्षाची लढाई लढावी लागते. ‘लाच दिली तरच काम, अन्यथा छळवणूक’ अशा अघोषित नियमामुळे अनेक तरुण आता नैराश्यातून चुकीच्या मार्गांकडे वळण्याची भीती व्यक्त होत आहे.
श्रीरामपूर टाइम्सचा ‘सत्यशोध’ प्रवास सुरू
श्रीरामपूरमधील या छुप्या भ्रष्टाचारावर आणि प्रामाणिक लोकांच्या गळचेपीवर ‘श्रीरामपूर टाइम्स’ आता प्रकाशझोत टाकणार आहे. ही केवळ एक बातमी नसून, व्यवस्थेच्या जाचाखाली भरडल्या जाणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाचा हा आवाज आहे. येत्या काही दिवसांत आम्ही या संदर्भातील सविस्तर पुरावे आणि ग्राऊंड रिपोर्ट व्हिडिओसह प्रसिद्ध करणार आहोत.
जनतेला आवाहन:
जर तुम्हालाही अशाच प्रकारे कोणत्याही शासकीय कार्यालयात किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून नाहक त्रास दिला जात असेल, तर तुमचा अनुभव श्रीरामपूर टाइम्सशी शेअर करा. तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल, पण तुमचा आवाज राज्यापर्यंत पोहोचवला जाईल. सत्याचा विजय होण्यासाठी तुमची साथ मोलाची आहे..






